बीड / प्रतिनिधी
दुचाकीला कंटेनरने पाठीमागून  धडक दिल्याने  पाठीमागे बसलेली नऊ वर्षीय मुलगी कंटनेरच्या पाठीमागील टायरखाली पडली. टायर मुलीच्या शरिरावरुन गेल्याने ती जागीच ठार झाली. ही दुर्देवी घटना आज सकाळी बार्शीरोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. कंटेनर चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले.
या घटनेची थोडक्यात माहिती अशी कि उध्दव भानूदास चंदनशिव रा.मित्रनगर हे आजसकाळी आपल्या दुचाकीवर वायभटवाडीकडे जात होते. त्यांच्यासोबत त्यांची नऊ वर्षीय नात किमया अमर देशमुख ही होती. राष्ट्रवादी भवनासमोर त्यांच्या दुचाकीला इंदौरहून बीडकडे येणारा कंटेनर क्र. एम.एच.१२.ओ.८१४३ ने धडक दिली. यामध्ये पाठीमागे बसलेली किमया देशमुख ही कंटेनरच्या पाठीमागील टायर खाली आली. त्यात ती जागीच ठार झाली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून घटनास्थळी पोलीसांनी येवून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला .दरम्यान किमया देशमुख ही औरंगाबाद येथील असून ती काही दिवसापूर्वी आपल्या आजोबाकडे आलेली होती.