सडेतोड एस एम देशमुख

अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी अग्रलेख मागे घेण्याऐवजी राजीनामा मालकांच्या तोंडावर फेकला असता…जागतिक नामुष्की वाट्याला आली तरी त्यांनी खुर्ची सोडली नाही यांचं कारण खुर्चीचं महत्व ते जाणून होते,.. आहेत.. संपादकांच्या खुर्चीवर बसून सारे लाभ तर मिळवता येतातच शिवाय जगाला तुच्छ लेखत फुकटचे सल्ले देण्याचा निसर्गदत्त अधिकारही प्राप्त होतो .. अग्रलेख मागे घेतलेले कुबेर हा अधिकार पुरेपूर उपभोगत आहेत.. आयुष्यात कधी ढेकळात न गेलेले हे महाशय शेतकरयांच्या नावानं शिमगा करणार, त्यांना मिळणारया सवलतींबददल कायम ठणाणा करतात, चळवळीशी सुतराम संबंध नसलेले हे महाशय कायम चळवळींच्या विरोधात आपली लेखणी पाजळत राहणार.. हक्काची भाषा करणारा यांना चालत नाहीत.. लोकप्रिय मागण्यांना विरोध करून आपण प्रवाहाच्या विरोधात पोहणारे संपादक असल्याचा आभास निर्माण करण्याचा कुबेरांचा सतत प्रयत्न असतो.. त्यामुळे नकारात्मक भूमिका घेऊनच त्यांची सकाळ होते.. बहुसंख्य पत्रकार जेव्हा पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी करीत होते तेव्हा हे विद्वान “पत्रकारांना असा विशेष दर्जा देण्याचं कारण काय” ? असा प्रश्न विचारत होते.. पत्रकार पेन्शनच्या वेळेस देखील त्यांची अशीच कुरबूर सुरू होती.. पत्रकारांना तरी कुठे हौस आहे, सरकारपुढे हात पसरण्याची..? पण माध्यमांचे मालक पत्रकारांना कोणतेच सरंक्षण देत नसतील गिरीश कुबेर यांच्यासारखे संपादक मालकांच्या हो ला हो मिळवून स्वतःच्या खुर्च्या टिकवत सहकरयांच्या हक्कांचा बळी देत असतील तर कोणाला तरी संरक्षण मागावेच लागेल.. बरं सरकार पत्रकारांसाठी चार गोष्टी करून पत्रकारांवर काही उपकार करीत नाही, ज्या समाजासाठी पत्रकार आयुष्य वेचतो त्या पत्रकारांची काळजी घेणे ही समाज आणि सरकारची जबाबदारी आहे..हे सर्वत्र होते.. गिरीश कुबेर यांच्या सारखे संपादक काय म्हणतात याची पर्वा न करता सरकार ती जबाबदारी पार ही पाडत असते .. कुबेराच्या नाकावर टिच्चून कायदा झाला, पेन्शन मिळाली, आरोग्य विषयक सुविधा मिळाल्या हे पाहून कायम अस्वस्थ असलेल्या कुबेरांना पत्रकारांना लस देण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी पक्षपाती, गैरवाजवी, बेजबाबदारपणाचे वाटायला लागली.. वाटू द्या, तुम्हाला विचारतो कोण? कुबेर हे हस्तिदंती मनोरयात बसतात.. ते कमालीचे माणूसघाणे असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची सुतराम शक्यता नाही.. मात्र महाराष्ट्रभर विखुरलेले पत्रकार गिरीश कुबेर यांच्यासारखे भाग्यवान नाहीत.. त्यांना रोजीरोटीसाठी रस्त्यावर उतरावे लागते..माणसात जावे लागते, जगण्यासाठी धावपळ करावी लागते.. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते..बाधित होणारया पत्रकारांच्या हालअपेष्टाना पारावार नसतो.. ऑक्सीजन, व्हेटिलेटर न मिळाल्याने अनेक पत्रकारांचे जीव गेले आहेत.. अशी वेळ गिरीश कुबेर यांच्यावर येण्याची शक्यता नाहीच. .. मालकांचे लांगुलचालन करून टिकविलेलया खुर्चीची सारी यंत्रणा दिमतीला आहे.. शिवाय सरकारची यंत्रणा देखील दिमतीला असतेच.. सर्व सुविधा घरबसल्या मिळाल्यावर इतरांच्या किरकोळ सवलती देखील डोळ्यात खुपायला लागतात.. मग तात्विकतेचे मुलामे देत विरोध सुरू होतो.. गलेलठ्ठ पगाराचे ढेकर देत इतरांना उपदेशाचे डोस पाजणे सोपे असते.. पण महाराष्ट्रातील ज्या 130 पत्रकारांना केवळ योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूला कवटाळावे लागले अशा पत्रकारांच्या घरातील जीवघेणा आक़ोश संवेदनाशून्य कुबेराच्या कानावर जाण्याची शक्यता नाही.. लस देण्यास होणारा विरोध हा या संवेदनाशून्यतेचा भाग आहे.. पत्रकारांना लस देताना विशेष सवलत देण्याची गरज नाही असं सांगणारे कुबेर यांनी कोणत्या ठिकाणी रांगेत उभे राहून लस घेतलीय ते सांगावं . महापालिकेच्या रूग्णालयालमोर लागलेल्या लांबच लांब रांगेत गिरीश कुबेर उभे असल्याचे चित्र लोकसत्तानं कधी छापलेलं नाही.. याचा अर्थ त्यांनी संपादक असल्याचा ठेंभा मिरवतच लस घेतलेली असली पाहिजे.. म्हणजे आपण करतो ते सारं नैतिक, जबाबदारपणाचे आणि इतरांच्या मागण्या अनैतिक आणि बेजबाबदारपणाच्या हे ढोंग आम्हाला मान्य नाही… गिरीश कुबेर यांनी कितीही कुरबुर आणि टिवटिव करावी आमच्यावर फरक पडणार नाही.. राज्यातील बहुसंख्य पत्रकारांना लस हवीय, ऑक्सीजन हवाय त्यामुळे साडैतीन टक्के कुबेरछाप मंडळी काय म्हणतेय यानं ना सरकारवर काही फरक पडेल ना आमच्या चळवळीवर.. ज्या ज्या गोष्टींना कुबेर यांनी विरोध केला त्यासर्व गोष्टी पदरात पाडून घेण्यात राज्यातील पत्रकार यशस्वी ठरले.. यावेळेस देखील मागची पुनरावृत्ती होणार असल्याने कुबेर यांच्यावर पुन्हा आदळ आपट करण्याचीच वेळ येणार हे नक्की

एस.एम.देशमुख