पुणे:करोना ससंर्गाची तीव्रता कमी होत नाही तोच पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर मध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील हा ‘झिका ‘ विषाणूचा पहिला रुग्ण ठरला आहे. एका ५० वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
‘पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘झिका’ आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण आहे. बेलसर हे सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या ठिकाणी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून तापाचे रुग्ण आढळून येत होते. त्यातील पाच रुग्णांचे नमुने १६ जुलैला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) येथे तपासण्यासाठी पाठविले असता त्यापैकी तीन जणांना चिकुनगुनिया आजाराचे निदान झाले. २७ ते २९ जुलै या कालावधीत एनआयव्हीने डेंगी, चिकुनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांनी बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया, तर तीन जणांना डेंगीचा आजार असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिका विषाणू आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष शुक्रवारी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रात आढळलेला पहिला ‘झिका’ रुग्ण आहे. या महिलेला चिकुनगुनियाची देखील बाधा झाली असून हा मिश्र विषाणू संसर्ग आहे,’ अशी माहिती राज्य रोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.