जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर आहे. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे.
२३ एप्रिलच का?
विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
कॉपीराइट म्हणजे काय?
कॉपीराइट कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधीकधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो, त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
जागतिक पुस्तक दिवस २०२० थीम
दरवर्षी, जागतिक पुस्तक दिनाची एक विशिष्ट संकल्पना असते. यावर्षी ‘ज्ञान देण्याबरोबर पुस्तकांमध्ये मनोरंजन करण्याची अद्वितीय क्षमता आहे’ हा विषय मध्यवर्ती आहे. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात, यात शंकाच नाही, परंतु पुस्तकांमध्ये बर्‍याच मनोरंजक गोष्टी देखील वाचायला मिळतात. ती आपले मनोरंजन देखील करतात. आपली भाषा देखील पुस्तकाद्वारे सुधारते.
कसा साजरा केला जातो हा दिवस?
हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात.(साभार मटा)