कोरोनावर लस शोधल्याचा इटलीत दावा
रोम (इटली) – सर्वत्र दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूवर औषध शोधण्याचा जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. आता इटालियन संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी कोरोनावर एक यशस्वीरित्या लस विकसित केली आहे. कोरोनाबाधित रुग्णावर त्याची चाचणी घेण्याची शक्यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.
प्रथमच आम्ही तयार केलेल्या लसीमुळे पेशीतील कोरोनाचा विषाणू नष्ट करता आला, असे औषध विकसित करणाऱ्या टाकीस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी ऑरिसिचिओ यांनी सांगितल्याचे अरब न्यूजने म्हटले आहे. इटलीमध्ये कोरोनावर तयार करण्यात येत असलेल्या औषधांसंदर्भातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. उन्हाळ्यानंतर याच्या मानवावरील चाचण्या घेतल्या जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.संशोधकांनी या लसीचा उंदरावर यशस्वीरित्या प्रयोग करून पाहिला आहे. उंदराच्या पेशीमध्ये या लसीमुळे कोरोनाशी लढा देणारी प्रतिजैविके तयार झाली. तयार केलेल्या विविध लसींपैकी ज्या लसीमुळे पेशीत कोरोना विरुद्ध लढणारी जास्त प्रतिजैविके तयार झाली, अशा दोन लसींच्या नमुन्यांची निवड केली आहे. ही लस विशेषत: फुफ्फुसांच्या पेशींमध्ये कोरोना विषाणूसाठी सर्वात संवेदनशील असलेल्या ‘स्पाइक’ प्रथिनाविरूद्ध कार्यात्मक प्रतिजैविके तयार करण्यासाठी प्रभावी ठरेल.इतक्या प्रभावीपणे कोरोनाचा अटकाव करणारी लस मिळाली आहे. अशी लस विकसित करणारे जगातील कदाचित आम्ही पहिलेच आहोत, आम्हाला खात्री आहे, मानवी पेशींवरदेखील याचा उपयोग होईल. कोरोनावरील लस (औषध) शोधण्यासाठी आम्हाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था आणि भागीदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. जेणेकरून संशोधन प्रक्रियेचा आमचा वेग वाढवण्यास मदत होईल, असे औषध निर्माण कंपनीचे म्हणने आहे.