एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी ;जिल्हाधिकारी किंवा पोलिसाधिक्षक देणार परवानगी
मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून एकावेळी एका बसमधून केवळ २२ प्रवाशांनाच गावाला जाता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. येत्या १७ मेपर्यंतच ही सुविधा असेल असंही त्यांनी सांगितलं.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अत्यंत मोठा निर्णय जाहीर केला. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक मजूर, विद्यार्थी आणि इतर लोक अडकून पडले आहेत. त्या सर्वांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी या लोकांनी २२ जणांची एक यादी करावी. शहरातील लोकांनी ही यादी पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. त्यात त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायचं आहे, याची माहिती नोंदवायची आहे. २२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण सांगतील, त्यानंतर डेपोत येऊन बसमधून गावाला जायचे आहे. प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्याची स्वत:च व्यवस्था करावी. सोमवारपासून प्रत्येकाला आपल्या गावी जाता येणार असून त्यासाठी कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं.