अहमदनगर / प्रतिनिधी
जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयामध्ये मुख्य अभियंत्यांसमोरच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने वीजबिल थकबाकीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
भाजप नेवासा तालुका व शेतकऱ्यांच्या वतीने आज विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्ये सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. मुरकुटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास विनंती केली की, आज शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्याकडे कुठलेही पिक सध्या हातात नाही. साखर कारखाने नुकतेच चालू झाल्यामुळे अजून शेतकऱ्याकडे ऊसाचेही पेमेंट आले नाही. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी. मात्र, वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे वातावरण तापले. त्यानंतर नेवासाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तिथे दाखल झाले. त्यांनीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर तोडगा न निघाल्याने मुरकुटे यांनी विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील शेतकरी व आंदोलक यांनी तात्काळ मुरकुटे यांना पकडल्याने मोठा अनर्थ टळला.