क्वारंटाइन, आयसोलेशन आणि सोशल डिस्टन्सिंगमधील फरक जाणून घ्या?
‘करोना’ विषाणूच्या साथीमुळे सारं जग ढवळून निघालंय. १८५ देशात वैश्विक प्रसार मांडलेल्या या आजारामुळे भारतीय जनता संभ्रमित झाली. हा आजार नक्की कसा होतो? त्याला औषध का नाही? त्याच्या प्रतिबंधासाठी लस खरंच आहे की नाही? या प्रश्नांना समजून घेता-घेता नाकी नऊ आले आहेत. जनतेला नुकतेच काही नवे शब्द ऐकायला मिळाले. ‘क्वारंटाइन’, ‘आयसोलेशन’ आणि ‘सोशल डिस्टन्सिंग.’ सुशिक्षित जनतेलाही पूर्ण न समजलेल्या या संकल्पना सरकारकडून आणि मीडियाकडून सरसकट वापरले जाऊ लागल्यानं सर्वसामान्यांचा आणखी गोंधळ उडाला. त्यात ‘विलगीकरण’ हा एकच शब्द वर्तमानपत्रं आणि मीडियाकडून, ‘क्वारंटाइन’ आणि ‘आयसोलेशन’ या दोन्हीसाठी वापरला जात असल्यानं भल्याभल्यांची दांडी उडालेली दिसली. जगभरात मोठ्या प्रमाणात त्वरेनं पसरणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्रातील एपिडीमिऑलॉजी (रोगपरिस्थिती विज्ञान) या महत्त्वाच्या उपशाखेत सातत्यानं वापरले जाणारे हे उपाय आहेत. यामध्ये त्यामुळे या संज्ञांचा अर्थ जाणून घेणं आजच्या घडीला आवश्यक ठरतं.
क्वारंटाइन
एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ सुरू आहे, अशा प्रदेशातून कोणी व्यक्ती आली असेल. उदाहरणार्थ, सध्या ज्या देशात ‘करोना’ची साथ आहे अशा देशातून आलेले प्रवासी आपल्या देशात आल्यावर वरवर निरोगी वाटले, तरी त्यांना वेगळं ठेवलं जातं, त्यालाच ‘क्वारंटाइन’ असं म्हणतात. अशा व्यक्तींच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनाही हा आजार होऊन तो पसरण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यांनाही ‘क्वारंटाइन’मध्ये ठेवलं जातं.
जागा- या व्यक्तींना ‘क्वारंटाइन’साठी विशेष करून तयार केलेल्या इमारतीत, एखाद्या वेगळ्या वसतीगृहात, वेगळ्या जागेत ठेवलं जातं. अनेकदा अशा व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्याच घरात विशेष सूचना देऊन वेगळं ठेवलं जातं, त्याला ‘होम क्वारंटाइन’ म्हणतात.
मुदत – तिथं त्यांना ठेवण्याचा काळ, साधारणतः त्या आजारात शरीरात विषाणू किंवा जिवाणूंनी प्रवेश केल्यावर त्या रोगाची लक्षणं दिसू लागण्यासाठी जितके जास्तीत जास्त दिवस लागतात, तितके दिवस असतो. सध्याच्या साथीत ही मुदत १४ दिवसांची आहे. ‘क्वारंटाइन’च्या या काळात त्या व्यक्तींमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांचं बारकाईनं निरीक्षण केलं जातं. आवश्यक वाटलं, तर त्यांच्यावर आजाराचं निदान करणाऱ्या चाचण्या केल्या जातात.
आयसोलेशन
संसर्गजन्य साथीच्या आजारात ज्यांना तो आजार झाल्याचं पक्कं निदान होतं त्यांना इस्पितळात दाखल करावं लागतं. अशा व्यक्तींचा इतर रुग्णांना संपर्क होऊ नये म्हणून त्यांना वेगळ्या वॉर्डात ठेवलं जातं, याला ‘आयसोलेशन’ म्हणतात. या व्यक्ती रुग्णालयातच ठेवाव्या लागतात आणि त्यांच्यावर सातत्यानं उपचार आणि तपासण्या केल्या जातात. या रुग्णांमधील लक्षणं दूर होऊन त्यांच्या चाचण्या पूर्ण ‘नॉर्मल’ येईपर्यंत त्यांना’आयसोलेशन’मध्येच ठेवतात. रुग्णापासून इतरांमध्ये आजार पसरण्याचा प्रत्येक आजाराचा विशिष्ट अवधी असतो. हा अवधी संपेपर्यंत त्या रुग्णाला ‘आयसोलेशन’मध्येच ठेवावं लागतं.
‘क्वारंटाइन’ आणि ‘आयसोलेशन’मध्ये असलेल्या रुग्णांना तपासणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि इस्पितळातील इतर कर्मचाऱ्यांना रुग्णासमोर जाताना वैयक्तिक सुरक्षा साधने (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) म्हणजे विशेष मास्क्स, गॉगल्स, विशेष अंगरखे, पादत्राणे, ग्लोव्हज् त्या-त्या आजारातील आवश्यकतेनुसार वापरावी लागतात.
सोशल डिस्टन्सिंग : संसर्गजन्य आजार विशेषतः हवेतून पसरणारे श्वसनसंस्थेचे आजार टाळण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय करावा लागतो. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी न जाणे, समोरच्या व्यक्तीशी संपर्क करताना ६ फुटाचं अंतर ठेवणं अशा गोष्टी असतात. संसर्गजन्य आजाराच्या साथीत याकरताच शाळा, कॉलेज, सिनेमा-नाटकांची थिएटर बंद ठेवावी लागतात. मोठ्या ऑफिस कामगारांना सुट्टी द्यावी लागते किंवा शक्य असल्यास घरबसल्या काम करण्याची सवलत द्यावी लागते.
जनसंपर्कातून होणारा रोगसंसर्ग टाळणं हेच या सर्व उपायांमागाचं कारण असतं. या साऱ्याच्या पुढचं पाऊल म्हणजे शहर कुलूपबंद करणं, कर्फ्यू लावणं हेही असतं. रोगप्रतिबंधाच्या दृष्टीनं आवश्यक पावलं उचलणं आणि त्याचा प्रसार होऊ नये म्हणून अशा गोष्टी सक्तीनंही कराव्या लागतात. यासाठी सरकारला ‘एपिडेमिक अॅक्ट १८९७’चा पाठिंबा घ्यावा लागतो.
आजमितीला, ‘क्वारंटाइन’ आणि ‘आयसोलेशन’ या गोष्टी सर्वसामान्यांना, तुम्हाला-आम्हाला दूरच्या वाटल्या, तरी काय सांगावं? कदाचित आपल्यापैकी कुणावरही ही वेळ येऊ शकते. त्यामुळे याची माहिती आणि मानसिक तयारी प्रत्येकानं ठेवली पाहिजे. रोग निवारण करणं हे सरकारचं काम असलं, तरी या कार्यात स्वयंशिस्त बाळगणं, आरोग्यखात्यानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं खूप महत्त्वाचं असतं. आजच्या ‘करोना’च्या साथीत या पद्धतीनं तमाम भारतीय नागरिक वागले, तर ‘करोना’च काय, तर कोणत्याही आजारावर विजय मिळवणं शक्य आहे.

डॉ. अविनाश भोंडवे